Ad will apear here
Next
मिश्र डाळींच्या साटोऱ्या
मिश्र डाळींची साटोरी
  
रोजच्या जेवणात तूरडाळ आणि मूगडाळ सोडली तर इतर डाळींचा उपयोग फारसा केला जात नाही. त्यात डाळी पचायला जड असल्याचा समज असल्यामुळे बहुतांश लोक डाळींचे पदार्थ कमीच खातात; पण डाळींचे अनेक चांगले गुण आहेत. वाढत्या वयात शरीराला प्रथिनांची गरज असते. त्यामुळे आहारात डाळी व कडधान्ये असणे गरजेचे आहे. म्हणूनच या वेळी ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात आपण पाहणार आहोत मिश्र डाळींच्या साटोऱ्या...
...................
डाळीत असलेली प्रथिने शरीरातील स्नायूंना बळकटी देतात. डाळींमध्ये जस्त (झिंक), तंतुमय पदार्थ आणि शरीरात नैसर्गिकरीत्या तयार न होणारी अमिनो आम्लेही असतात.

मूगडाळ अगदी हलकी, पथ्याची डाळ आहे. प्रथिने शरीरात शोषले जाण्यासाठीचे घटक या डाळीत चांगल्या प्रमाणात आहेत. यातले विरघळण्याजोगे तंतुमय पदार्थ (सोल्युबल फायबर्स) शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत करतात. या डाळीत ‘बी- १२’ सोडून इतर सर्व ‘बी’ जीवनसत्त्वे असतात. ‘सी’ जीवनसत्त्व आणि फॉलिक अॅसिडही यात असल्यामुळे ही डाळ प्रतिकारशक्तीसाठीही चांगली आहे. 

मसूर डाळ फार कमी वापरली जाते; पण या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. हरभरा डाळीत ‘सी’ व ‘के’ व्हिटॅमिन आणि जस्त असते. हे घटकही शरीरात तयार झालेल्या अपायकारक पदार्थांपासून शरीरातील हृदय, मूत्रपिंड, मेंदू अशा नाजूक अवयवांचे रक्षण करायला मदत करतात. चणाडाळीतले कॅल्शियम हाडे, दात, नखे मजबूत करते. या डाळीत पोटॅशियम भरपूर आहे. त्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब योग्य असावा यासाठी ही डाळ मदत करते. शरीरातील ‘होमोसिस्टेन’ या द्रव्याची पातळी योग्य राहण्यासाठीही तिचा उपयोग होतो. अशा या बहुगुणी डाळींपासून साटोऱ्या कशा बनवता येतात, ते पाहू या. 

साहित्य :
सारणासाठी साहित्य
मूगडाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ - तिन्ही डाळी मिळून दीड वाटी, तेल – दोन चमचे, मोहरी – फोडणीसाठी, हिंग, मिरची व आले – चवीनुसार, धणे पूड – एक चमचा, जिरे पूड – एक चमचा, भाजलेली बडीशेप – अर्धा चमचा, साखर – अर्धा चमचा, लिंबू, चवीपुरते मीठ, आवडीप्रमाणे कोथिंबीर, साजूक तूप – अर्धा चमचा   

बाहेरील आवरणासाठी साहित्य 
रवा – अर्धी वाटी, मैदा – अर्धी वाटी, चवीपुरते मीठ, ओवा – पाव चमचा, तेल – दोन चमचे 

कृती : 
- सर्वप्रथम सर्व डाळी धुऊन घ्या. 
- नंतर त्या चार तास भिजत घाला व पाणी पूर्णपणे निथळून घ्या. 
- पाणी न घालता त्या मिक्सरने वाटून घ्या. 
- वाटतानाच त्यात आले व मिरची घाला.
- एका कढईत तेल घ्या. मोहरी व हिंगाची फोडणी देऊन हे डाळींचे वाटलेले मिश्रण फोडणीत घाला.
- ते व्यवस्थित परतून घ्या. थोडा वेळ हलवत राहा व एक वाफ येऊ द्या. 
- डाळी साधारण मोकळ्या झाल्यानंतर मीठ, साखर, धणेपूड, बडीशेप घालून एकत्र करा. 
- अगदी शेवटी लिंबाचा रस घालून गॅस बंद करा. 
- हे मिश्रण चांगले गार होऊ द्या. 
- बाहेरील आवरणासाठी रवा, मैदा, मीठ, ओवा व गरम तेलाचे मोहन एकत्रित घालून घट्टसर पीठ तासभर तरी भिजवून ठेवा. 
- नंतर ते मळल्यास छान गोळा तयार होईल.  
- आता या गोळ्यात वरील सारण भरून पुरीच्या आकाराची मोठी साटोरी लाटून घ्या.
- नॉनस्टिक तव्यावर साजूक तुपावर खमंग भाजून घ्या. 
- साटोऱ्या आदल्या दिवशी करून ठेवल्यास दुसऱ्या दिवशी मुलांना पटकन डब्यात देता येतात. 
- शिवाय हे खाणे पोटभरीचे होते. सोबत थोडे सॅलड द्यावे म्हणजे एक संतुलित खाणे होते. - साटोऱ्या आणखी चटपटीत बनवायच्या असल्यास सोबत चटणी व टोमॅटो सॉसही देता येईल.  
- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZDUBF
Similar Posts
मिश्र डाळींच्या साटोऱ्या रोजच्या जेवणात तूरडाळ आणि मूगडाळ सोडली तर इतर डाळींचा उपयोग फारसा केला जात नाही. त्यात डाळी पचायला जड असल्याचा समज असल्यामुळे बहुतांश लोक डाळींचे पदार्थ कमीच खातात; पण डाळींचे अनेक चांगले गुण आहेत. वाढत्या वयात शरीराला प्रथिनांची गरज असते. त्यामुळे आहारात डाळी व कडधान्ये असणे गरजेचे आहे. म्हणूनच या वेळी
डाळ साबुदाणा एक स्वादिष्ट घटक आणि स्टार्चचे गुणधर्म असलेल्या साबुदाण्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. आपल्याकडे केवळ उपवासाचा पदार्थ म्हणून खाल्ला जाणारा हा साबुदाणा इतर वेळेस फार खाण्यात येत नाही. म्हणूनच यावेळेस ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात आपण पाहणार आहोत डाळ साबुदाणा...
डाळींचा चिवडा चिवडा हा मुलांचा आवडता पदार्थ. सण-वार काळात तर घरात हमखास चिवडा असतो. मुलांचा हा आवडता पदार्थ आणखी वेगळ्या पद्धतीने चविष्ट आणि पौष्टिक बनवता आला तर..? यासाठीच आपण ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळेस पाहणार आहोत डाळींचा चिवडा...
मिश्र डाळींचे वडे हिवाळ्याच्या दिवसांत वेगवेगळ्या डाळी आणि विशेषतः कडधान्ये खाण्यावर भर दिला पाहिजे, असं डॉक्टर सांगतात. याने शरीराचे उत्तम पोषण होते. मुलांना डब्यातही मग असेच काही चविष्ट आणि पौष्टिक देता आले तर..? यासाठीच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी आपण पाहत आहोत मिश्र डाळींचे वडे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language